भगतसिंग स्मारक परिसराची स्वच्छता करून युवक काँग्रेसने वाहिली आदरांजली

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचा महापालिकेला पडला विसर

अमरावती / 28 सप्टेंबर : अमरावतीत पसरलेले घाणीचे साम्राज्य, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 19 जूनपासून सुरू झालेले हे अभियान गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील विविध भागात चालू आहे. महान क्रांतिकारक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज दि. 28 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील शहीद भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या स्मृतीस्तंभ परिसराची तसेच बोधिवृक्ष परिसरातील स्वच्छता युवक काँग्रेसने केली. शहराच्या मुख्य चौकातील या स्मारक परिसरात तणकटे वाढून अस्वच्छता निर्माण झाली होती. महापालिकेने येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते, मात्र भगतसिंगांची जयंती असूनही वाढलेल्या गवताची कापणीही केली नव्हती. मनपा प्रशासनाकडून या स्मारकाकडे झालेले दुर्लक्ष पाहून अमरावती विधानसभा युवक काँग्रेसने स्वतः पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली आणि त्यानंतर पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन केले. या प्रसंगी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निष्क्रीयतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि शहीदांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असून किमान जयंती व पुण्यतिथीला स्मरणकार्यक्रम आयोजित करावे, अशी मागणी केली. स्वच्छता मोहीमेनंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी “इंकलाब जिंदाबाद” आणि “शहीद भगतसिंग अमर रहे” अशा घोषणाबाजी करत शहीद भगतसिंगांना अभिवादन केले. तसेच त्यांच्या आदर्शांचा वारसा कायम ठेवून युवकांनी देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, अनिकेत ढेंगळे, आशिष यादव, अक्षय साबळे, आकाश धुराटकर, आकाश गेडाम, धनंजय बोबडे, मोहित भेंडे, शुभम बांबल, चैतन्य गायकवाड, शंतनु देशमुख, अंकुश टोपले, प्रियल मोहोड, सौरभ तायडे, कृणाल गावंडे, गोविंद ठाकरे, प्रफुल्ल तंतरपाळे, शिवानंद भोंगाडे, अनय वाटाणे, ओम कुबडे या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह डॉ. प्रशांत विघे व कैलास चव्हाण हे सिनेट सदस्य सुद्धा उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button