सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांचा संप 33 दिवसांनंतर मागे
थकित मानधन देण्याचे आश्वासन

-29 सप्टेंबरपासून पुन्हा रुग्ण सेवा
अमरावती / 28 सप्टेंबर : शहरातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 25 ऑगस्ट 2025 पासून सुरू असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपाला अखेर 27 सप्टेंबर संपला. हा संप तब्बल 33 दिवस चालला आणि या काळात सेवा ठप्प झाल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये धाव घेणे भाग पडले. काही रुग्णांची वैद्यकीय उपचारात विलंब झाल्याची तक्रारही नोंदली गेली.
संपाची मुदत संपल्यावर डॉक्टरांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक झाली, ज्यामध्ये आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके उपस्थित होते. या बैठकीत डॉक्टरांना त्यांचे थकित मानधन त्वरित अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, डॉक्टरांच्या वेतनात वाढ आणि नियमित देयक सुनिश्चित करण्यासाठी नवीन शासन निर्णय 15 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचे वचन दिले गेले. बैठकीत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढेही उपस्थित होते. डॉक्टरांना चार महिन्यांचे बकाया मानधन दिले गेले असून उर्वरित रक्कम लवकरच दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
संपामध्ये सहभागी असलेल्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा रुग्णालयात काम सुरू करण्याचे आणि रुग्णसेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. डॉक्टरांनी म्हटले की, रुग्णांची भलाई हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे आणि आम्ही आमच्या कर्तव्याचे पालन करत राहू. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 33 दिवस चाललेल्या या संपामुळे रुग्णालयाची दिनचर्या विस्कळीत झाली होती. आपत्कालीन रुग्णांसाठी तातडीने अन्य उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी, अनेक रुग्णांना प्रचलित उपचारांमध्ये विलंबाचा सामना करावा लागला. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांच्या मागण्यांवर त्वरित लक्ष देऊन समाधानकारक निर्णय घेतल्याने आता रुग्णसेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.




