अमरावती परिमंडलातील विद्युत उपकेंद्रांना आयओएस मानांकन
ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्याची नवी हमी

-करणवाडी, व माथार्जून उपकेंद्रांना प्रमाणपत्र
-महावितरण गुणवत्तेच्या नव्या धाटणीस प्रोत्साहन
अमरावती / 28 सप्टेंबर : महावितरणच्या अमरावती परिमंडलातील 33/11 केव्ही करणवाडी (खापरी) आणि 33/11 केव्ही माथार्जून विद्युत उपकेंद्रांचे उत्कृष्ट सक्षमिकरण आणि नुतणीकरण करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्रांना प्रथमच आयएसओ मानांकन मिळाले आहे. या सुधारणांमुळे वीज ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा मिळेल अशी माहिती संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिली. महावितरणच्या पांढरकवढा विभागाअंतर्गत करणवाडी (खापरी) उपकेंद्र परिसरात आयएसओ मानकाचे प्रमाणपत्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, कार्यकारी अभियंते नरेंद्र कटारे, संजय खंगार आणि शशांक पोंक्षे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी केले, सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता श्यामसुंदर कुर्रा यांनी तर आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता विनोद मानकर यांनी मानले. पवार यांनी सांगितले की, ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची प्राथमिक जबाबदारी आहे. आयएसओ मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा थेट ग्राहकांना मिळणार आहे. त्यांनी अधोरेखित केले की, जिल्ह्यातील ही दोन उपकेंद्रे प्रेरणादायी ठरावीत आणि प्रत्येक उपविभागात किमान एका उपकेंद्राचे सक्षमिकरण व नुतणीकरण खडज मानकानुसार करावे.
महावितरणमध्ये ग्राहकाभिमुख धोरणात्मक बदलही करण्यात आले असून नुकत्याच 5,500 विद्युत सहाय्यकांची पदभरती झाली आहे. यामुळे ग्राहक सेवा अधिक प्रभावी होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. अमरावती परिमंडलातील बडनेरा उपविभागातील 33 केव्ही लोणी (टाकळी), मारेगाव उपविभागातील 33 केव्ही करणवाडी (खापरी) आणि झरी जामणी उपविभागातील 33 केव्ही माथार्जून या तीन विद्युत उपकेंद्रांना मानांकन मिळाले असून, ही महावितरणसाठी अभिमानाची बाब आहे.
मानांकनामुळे उपकेंद्रांचे सक्षमिकरण, उपकरणांची गुणवत्ता, ट्रान्सफॉर्मर आणि नियंत्रण यंत्रणा यांचे नुतणीकरण केले गेले असून, उपकेंद्राच्या विद्युत वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करून तांत्रिक बिघाड कमी करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे ग्राहकांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल. पवार यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून केलेले धोरणात्मक बदल महावितरणच्या कामकाजात नवे पाऊल आहे. यावेळी त्यांनी महावितरणमधील अन्य उपकेंद्रांनाही मानकानुसार सुधारणा करण्याचे आवाहन केले. सुधारित उपकेंद्रांचा फायदा थेट ग्राहकांना होईल, वीज वितरण अधिक स्थिर व विश्वासार्ह होईल असे ते म्हणाले. या उपकेंद्रांमुळे महावितरणच्या गुणवत्तेच्या नव्या धाटणीला प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यात जिल्ह्यातील इतर उपकेंद्रांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




