आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते ललित झंझाड यांचा सत्कार
अमरावतीत संघटनाला नवे बळ

* नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुखांना नियुक्तीपत्र प्रदान
अमरावती /26 सप्टेंबर : शिवसेना (शिंदे गट) तर्फे नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक ललित रा. झंझाड यांना आज औपचारिकरित्या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अमरावती शहरातील एका साध्या पण उत्साही वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना नेते व खासदार आनंदराव अडसूळ तसेच संपर्कप्रमुख अभिजीत अडसूळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झंझाड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी, युवा कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या भाषणात ललित झंझाड यांना शुभेच्छा देत म्हटले की, अमरावती जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी अशा तरुण नेतृत्वाची गरज आहे. झंझाड यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोम निर्माण होईल आणि पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील. तर अभिजीत अडसूळ यांनी सांगितले की, ललित झंझाड हे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तत्पर असलेले युवा नेतृत्व आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या संघटनात्मक कार्याला नवे दिशा मिळेल. या वेळी ललित झंझाड यांनी मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, मी आजवर शिवसेना पक्षाच्या विचारधारेनुसार कार्य करत आलो आहे. एकजूट ठेवून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी झुंज देणे हेच माझे प्राधान्य राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून मी युवासेनेपासून माझ्या पक्ष कार्याची सुरुवात केली होती. आज उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे अधिक कर्तव्यदक्षतेने आणि निष्ठेने पक्ष कार्याला वाहून घेईन. झंझाड हे बडनेरातील एक युवा आणि कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून ओळखले जातात. बडनेरा शहरासोबतच अमरावतीत शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही काळातील राजकीय स्थित्यंतरात विकासाभिमुख दृष्टिकोन स्वीकारत त्यांनी शिंदे गटाची साथ धरली. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढविण्यास त्यांनी मोठे योगदान दिले आहे. या नियुक्तीमुळे अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ मिळणार असून झंझाड यांच्या नेतृत्वामुळे पक्ष कार्यात अधिक जोम निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी हे पद झंझाड यांना मिळाल्यामुळे आमच्यात नवी ऊर्जा आली आहे. एक सामान्य कार्यकर्ता आज जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या भूमिकेत पोहोचतोय ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे, अशा भावना व्यक्त केल्या.




