भक्तांच्या हाकेला धावुन तारणारी स्वयंभू जगदंब पार्वती माता

आजपासुन शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वरुड । 21 सप्टेंबर – भक्तांच्या हाकेला धावून तारणारी एकदरा येथील स्वयंभू जगदंब पार्वती माता असून आजपासून शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तालुक्यातील एकदरा येथील अतिप्राचीन, पुरातन आणि ऐतिहासिक जगदंबा पार्वती माता मंदिर पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आणि विदर्भातही प्रसिद्ध आहे. हेच तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी स्वयंभू जगदंबा पार्वती माता तत्काळ पावते, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. शेकडो वर्षांपूर्वी अतिप्राचीन काळात गावा शेजारी एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदकाम करताना रक्ताची चिंगारी उडताना दिसली. त्याचा शोध घेतल्यावर लिंगस्वरूपात मूर्ती आढळून आली. तीच स्वयंभू साक्षात मूर्ती आजही मंदिराच्या गाभाऱ्यात स्थित आहे. मूर्तीच्या बाजूलाच छोटेसे बाहुली तीर्थकुंड आहे, ज्यातील तीर्थाचे अत्यंत महत्त्व सांगण्यात येते. याच गाभाऱ्यात काही कालांतराने पूर्ण शरीराचे अवयव अलग-अलग करून अष्टांग सिद्ध योगसाधना करणारे अजपाल महाराज साधना करून गेले, असे पुरातन इतिहासात सांगितले जाते. आजही जो कोणी भक्त श्रद्धा आणि भावनेने नतमस्तक होतो, त्याची मनोकामना पूर्ण होते, असा पंचक्रोशीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात ह.भ.प. एकनाथ महाराज अचलपूर यांच्या देवी भागवत पारायण, गरबा नृत्य, गावातील व बाहेरून येणाऱ्या मंडळांची भजने असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. रात्री पहाटे ३ वाजल्यापासून पंचक्रोशीतील भाविकांचा जनसागर येथे लोटतो. या निसर्गरम्य परिसराची शोभा अवर्णनीय असते. तरीही बाहेरून येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकदरा ग्रामस्थ आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button