आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्याचा परिचारिकेवर अडीच वर्षे अत्याचार

शारीरिक व मानसिक छळ

-पिडितेच्या मुलीवरही विकृत नजर
-गुन्हा दाखल, समाजात संताप
नांदगाव पेठ / 21 सप्टेंबर : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या कठोरा बु. येथील एका नामांकित आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राचार्यावर परिचारिकेने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली असून या घटनेने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळासह समाजमन संतप्त झाले आहे. पीडित 46 वर्षीय परिचारिकेवर गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर पीडितेच्या मुलीवरही प्राचार्याने विकृत मागण्या केल्याचे धक्कादायक वास्तव तक्रारीत नमूद आहे.
पीडित महिला वर्ष 2022 मध्ये महाविद्यालयात परिचारिका म्हणून रुजू झाली. रुजू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्राचार्याने तिला कार्यालयात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केला. विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याने ती मानसिकदृष्ट्या दबावाखाली आली. डिसेंबर 2022 पासून एप्रिल 2025 पर्यंत हा अमानुष प्रकार सातत्याने सुरू राहिला. मानसिक ताण व शारीरिक छळामुळे पीडित परिचारिकेची तब्येत खालावली. उपचारासाठी ती महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाली असता स्वतः प्राचार्याने उपचार थांबवण्याचे आदेश देऊन आवश्यक वैद्यकीय मदत मिळण्यापासून तिला रोखले. यामुळे तिच्या आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम झाला.
प्राचार्याच्या विकृत वर्तनाचा कळस तेव्हा गाठला गेला जेव्हा त्याने परिचारिकेच्या तरुण मुलीवरही वाईट नजर ठेवत शारीरिक सुखाची मागणी केली. ही मागणी नाकारताच पीडितेला एप्रिल 2025 मध्ये नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार करून अखेर पीडित महिलेने 19 सप्टेंबर रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ गंभीर गुन्हे नोंदवले असून बलात्कार, लैंगिक शोषण, धमकी यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून एका महाविद्यालयाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीनेच असा अमानुष प्रकार केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button