नागपूर-पुणे दरम्यान दोन नवीन सुपरफास्ट विशेष गाड्या

बडनेरात थांबा, जिल्ह्याच्या प्रवाशांची सोय

-29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत फेर्‍या
-वंदे भारत, प्रीमियम गाड्यांच्या प्रवाशांसाठी पर्याय
अमरावती / 17 सप्टेंबर : नागपूर-पुणे दरम्यान दिवाळी आणि छठच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन सुपरफास्ट विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बडनेरासह अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे स्थानकावर थांबे मिळणार असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
दिवाळी आणि छठ पर्वाच्या काळात होत असलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर-हडपसर (पुणे) दरम्यान आठवड्यातून दोन सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बडनेरा या महत्त्वाच्या स्थानकासह अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील प्रवाशांना थेट सोयीचा लाभ होणार आहे. गाडी क्रमांक 01201 नागपूर-हडपसर सुपरफास्ट विशेष नागपूरहून प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी रात्री 7.40 वाजता सुटेल. ती दुसर्‍या दिवशी मंगळवार व शुक्रवार सकाळी 11.25 वाजता हडपसर येथे पोहोचेल. ही सेवा 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उपलब्ध असेल.
तर गाडी क्रमांक 01202 हडपसर-नागपूर सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार दुपारी 3.50 वाजता हडपसरहून सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी बुधवार आणि शनिवार सकाळी 6.30 वाजता नागपूरला दाखल होईल. ही सेवा 30 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उपलब्ध असेल. या गाडीला नागपूर ते पुणे दरम्यान वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, ऊरळी आणि पुणे जं. अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील.
बडनेरात थांबा मिळाल्याने अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही गाडी खास सोयीची ठरणार आहे. गाडीत एकूण 18 डबे असतील. त्यात 4 एसी 3-टियर, 6 स्लिपर, 6 सर्वसाधारण श्रेणी तसेच 2 द्वितीय श्रेणी सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असेल. नागपूर-पुणे दरम्यान याआधीपासून प्रवाशांसाठी विविध गाड्या धावत आहेत. त्यात वंदे भारत एक्सप्रेस, आझाद हिंद, महाराष्ट्र, गरीब रथ, हमसफर, दुरान्तो, पुणे-अजनी एक्सप्रेस व नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस या प्रमुख आहेत. याशिवाय 6 ऑगस्टपासून नागपूर-पुणे प्रीमियम ट्रेन नियमितपणे सुरू झाली असून तिचाही मोठा लाभ प्रवाशांना होत आहे.
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्व वंदे भारत गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी ठरली आहे. ती फक्त 12 तासांत नागपूर-पुणे प्रवास पूर्ण करते व धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवर थांबते. प्रवाशांचा वेळ वाचवून सोयीशीर प्रवास देणारी ही एक्सप्रेस अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. दिवाळी आणि छठ पर्वासाठी वाढलेल्या रेल्वे प्रवासाच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने दोन नवीन सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा घेतलेला निर्णय नागपूर, विदर्भ तसेच बडनेरा मार्गे प्रवास करणार्‍या अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button