हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह तळ्यात आढळला
दोन दिवसांच्या शोधानंतर उलगडा

-तिवसा तालुक्यातील विरगव्हाणमध्ये शोककळा
कुर्हा / 16 सप्टेंबर : तिवसा तालुक्यातील विरगव्हाण गावातील हरवलेला 11 वर्षीय ध्रुप विजय राठोड हा मुलगा अखेर मृत अवस्थेत आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हरवलेल्या या चिमुकल्याच्या शोधात नातेवाईक तसेच ग्रामस्थ रात्रंदिवस कामाला लागले होते. मात्र, आज मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शेततळ्यात आढळल्याने शोककळा पसरली आहे.
ध्रुप विजय राठोड हा रविवारी, 14 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता घरातून बाहेर पडला होता. तो घरच्यांना काहीही न सांगता खेळण्यासाठी गेला, मात्र संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. दिवसभर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी शेजारील गावे, शेतमळे, वस्तीवस्त्या याठिकाणी शोध घेतला. पण त्याचा काही ठावठिकाणा न लागल्याने अखेरीस वडील विजय राठोड यांनी कुर्हा पोलीस स्टेशन गाठून मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल होताच कुर्हा पोलिसांनी नातेवाईक व गावकर्यांच्या मदतीने वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबवली. परंतु दोन दिवसानंतर मंगळवारी दुपारी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात ध्रुपाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतकर्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही माहिती गावात पसरताच काही क्षणांत तळ्याकाठी मोठी गर्दी झाली. ग्रामस्थ, नातेवाईक व शाळकरी मित्रांनी मृतदेह पाहताच खळबळ उडाली. ध्रुपच्या अकाली जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, कुर्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तळ्यातून बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.




