विवाहाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीचे शोषण

गर्भधारणेनंतर प्रसूती, बाळाला दिला जन्म

-आरोपी दीपक काळेला अटक
अमरावती / 16 सप्टेंबर : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करत तिच्यावर दुराचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी वडापाटी येथील दीपक श्रीकृष्ण काळे (वय 22) यास अटक केली आहे. पीडित तरुणी 21 वर्षांची असून, तिच्याकडून दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये चिखलदरा तालुक्यातील दत्तझरी यात्रेदरम्यान पीडितेची ओळख दीपक काले याच्यासोबत झाली. यावेळी दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. काही दिवसांनी, 16 डिसेंबर 2024 रोजी दीपक काळे याने पीडित युवतीला फोन करून गावाजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे त्याने विवाहाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर, कुणाला काही सांगितल्यास जीव घेण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या दुराचारानंतर युवती गर्भवती झाली. अखेर, 14 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली असून तिने एका बाळाला जन्म दिला. या सर्व घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून चिखलदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे चिखलदरा पोलिसांनी दीपक श्रीकृष्ण काळे याच्याविरुद्ध दुराचारासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button