सौम्या शर्मा-अर्पित चांडक दांपत्याचं अमरावतीत तुलादान
श्रद्धा-सेवाभावाचे दर्शन...गौ पूजा व परिक्रमा

-गौरक्षण संस्थेत मुलाच्या जन्मदिनी सोहळा
-राष्ट्रीय पुरस्काराबद्दल पथकाचा गौरव
अमरावती / 16 सप्टेंबर : अमरावतीच्या धार्मिक-सामाजिक जीवनात सोमवारी एक अर्थपूर्ण क्षण आकारास आला. शहर स्वच्छता व प्रदूषणमुक्तीबाबत राष्ट्रीय पुरस्कार पटकावून नवा मानाचा टप्पा गाठत असताना, श्रद्धा, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम घडवणारा स्नेहसोहळा गौरक्षण संस्थेत साकारला.
मनपा आयुक्त सौम्या शर्मा व अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक हे पती-पत्नी आपल्या परिवारासह संस्थेत दाखल झाले. मुलाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी धार्मिक परंपरेला साजेशा वातावरणात विधिवत तुलादान विधी केला. चांदीच्या तराजूत धान्य, गूळ व हिरवा चारा गौमातेस अर्पण करण्यात आला. सात गौमातांची परिक्रमा करून परिवाराने आशीर्वाद घेतले. उपस्थितांचे जयघोष व मंगलध्वनी यात पूर्ण सोहळा न्हाऊन निघाला.
गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. आर. बी. अटल, सचिव दीपक मंत्री, श्याम भैया, ओमप्रकाश लड्ढा, मनोहर मालपानी, अॅड. विनोद लखोटिया, कमल सोनी, वसंत कलंत्री यांसह असंख्य मंडळींनी चांडक-शर्मा परिवाराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हर्षोल्हासाच्या वातावरणातच संस्थेच्या पदाधिकार्यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहराला स्वच्छतेसाठी मिळालेल्या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण पुरस्काराबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले. या वेळी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या संपूर्ण सोहळ्यात श्रद्धा, संस्कृती, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर मेळ दिसून आला. धार्मिक आस्थेला आधुनिक स्वच्छतायज्ञाची जोड मिळाल्याने हा कार्यक्रम शहरवासीयांसाठी संस्मरणीय ठरला.




