प्रविण नगरच्या मशिदीवर वीज कोसळून मिनारला तडे

अमरावतीत तीन तास पावसाचा कहर

-वीजेअभावी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य
-वाहनचालकांची तारांबळ, नागरिकांची अडचण
अमरावती / 15 सप्टेंबर : सोमवार सायंकाळी अवकाळी आलेल्या दणदणीत वादळी पावसाने अमरावती शहराला अक्षरशः थांबवून धरले. तीन तासांच्या विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. या जोरदार पावसात प्रविण नगरमधील व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मशिदीवर वीज कोसळली. या दुर्घटनेत मशिदीच्या मिनारचा काही भाग तुटून तडा गेला, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही, यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुपारपर्यंत स्वच्छ आकाश आणि कडक उन्हामुळे जनजीवन नेहमीप्रमाणे सुरु होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणाने अचानक रंग बदलला. आकाशात काळे ढग दाटले, सर्वत्र अंधार पसरला आणि क्षणार्धात जोरदार पाऊस सुरु झाला. पावसाचा तडाखा तब्बल अडीच ते तीन तास कायम राहिला. या प्रखर पावसामुळे विविध भागांत वीज खंडित झाली; पथदिवे आणि घरातील वीज गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले. वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. वाहने फक्त हेडलाईटच्या उजेडात रेटून चालवावी लागत होती. राजापेठ अंडरपाससह शहरातील काही मार्केटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. रस्त्यांवर जागोजागी पाण्याचे डबके पडल्याने चालणंही कठीण झाले.
मशिदीवर वीज कोसळल्यानंतर जबाबदार प्रतिनिधी आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रात्री सातच्या सुमारास पाऊस थांबला, मात्र या तीन तासांच्या तांडवाने अमरावती शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळित झाले.

संबंधित बातम्या

Back to top button