अंजनगाव घरफोडीत बुलढाण्याच्या चोरट्याला अटक

आरोपी कुख्यात शकील डॉन टोळीतील सदस्य

-मुख्य सूत्रधार शकील अद्याप फरार
अंजनगाव सुर्जी/ 15 सप्टेंबर  : अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेला अखेर अंजनगाव पोलिसांनी मोठा धक्का देत बुलढाण्यातील कुख्यात शकील डॉन टोळीतील एक घरफोड्या अटक केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात ही टोळी दिवसाढवळ्या बंद घरे फोडून रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करत होती. 9 सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास, अंजनगावमधील आशा नगर स्वप्ननगरी भागातील दोन बंद घरातून लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीस गेले. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम 305 आणि 331(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि अंजनगाव पोलिस व जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बुलढाण्यात धाड टाकली. यादरम्यान शकील डॉन टोळीचा कुख्यात गुन्हेगार शेख अहमद शेख समद (वय 36) याला पोलिसांनी गाठ घालत बेड्या ठोकल्या. मात्र, टोळीचा मुख्य सूत्रधार शकील डॉन सध्या फरार असून त्याचा पोलिस चोख शोध घेत आहेत. न्यायालयाने आरोपीस 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, त्याच्या चौकशीतून जिल्ह्यातील घरफोडी मालिकांचे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक सूरज बोंडे व उपनिरीक्षक सूरज तेलगोटे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. अंजनगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत चिरडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button