कुत्र्यावरुन वाद पेटला, बडनेर्यात तणाव
दोन गट आमनेसामने, चार जणांविरुद्ध गुन्हे

-रात्रभर तगडा पोलीस बंदोबस्त स्थिती सुरळित
अमरावती / 15 सप्टेंबर : एका कुत्र्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून बडनेर्यात रविवारी रात्री दोन गट आमनेसामने येताच वातावरण तणावपूर्ण झाले. हॉटेलसमोर घडलेली घटना संघर्षात रुपांतरित होणार, अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच पोलिसांनी त्वरेने हस्तक्षेप करून समजूत काढली आणि परिस्थिती लगेच नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटांतील चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण रात्रभर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे 9 वाजता एका हॉटेलबाहेर रस्त्यावर भटक्या कुत्र्याने मूत्रविसर्जन केले. हे पाहून हॉटेल चालकाने कुत्र्याला काठीने मारले. तेवढ्यात तेथून जात असलेल्या मद्यप्राशन केलेल्या एका व्यक्तीच्या भावना दाटून आल्या व त्याने कुत्र्याला मारल्याबद्दल जाब विचारुन हॉटेल चालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहोचण्याची चिन्हे निर्माण झाली. या प्रकाराची माहिती इतरत्र पोहोचताच अल्पावधीतच दोन्ही बाजूंचे परिचित व समर्थक घटनास्थळी जमा झाले. पाहता पाहता दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकताच परिसरातील वातावरण तापले.
याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत जमावाला पांगवले. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. रात्रभर बडनेर्यात पोलीस तैनात राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आली. सकाळपर्यंत परिस्थिती पूर्णपणे शांत झाली आहे.




