भररस्त्यात उभारलेले अनधिकृत मंदिर हटविले

मनपाची अतिक्रमणविरोधी मोहीम

-श्रीधर नगर व चवरे नगरात कारवाई
-सार्वजनिक रस्त्यावरील अडथळे दूर
अमरावती / 15 सप्टेंबर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या मोहिमेला आज पुन्हा गती मिळाली असून, अधिकृत परवानगीशिवाय सार्वजनिक रस्त्यावर उभारलेले अनधिकृत मंदिर हटविण्यात आले. ही कारवाई आज सोमवारी, सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत झोन क्रमांक 4 (बडनेरा) अंतर्गत करण्यात आली. नगरविकासाच्या स्पष्ट आदेशांनुसार रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
श्रीधर नगर व चवरे नगर परिसरात, नामदेव झोंबाडे यांच्या प्लॉटसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही रहिवाशांनी परवानगीशिवाय मंदिराचे बांधकाम उभारले होते. या अडथळ्यामुळे परिसरातील वाहतुकीत दीर्घकाळ अडचण निर्माण होत होती. मनपा प्रशासनाने आज सकाळीच पोलिस बंदोबस्तासह अतिक्रमण पथक कार्यरत केले व संबंधित बांधकाम समन्वयाने काढून टाकले. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (प्रशासन) डॉ. मेघना वासनकर यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पाडली गेली. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट, शाखा अभियंता कल्पेश अढाऊ तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुटसुटीत पद्धतीने व कोणताही वाद निर्माण न होता अवघ्या काही तासांत ही कारवाई पूर्ण झाली.
रहिवाशांनी उभारलेले हे बांधकाम हटविल्याने रस्ते पूर्णपणे मोकळे झाले असून नागरिकांना आता वाहतुकीस अधिक सुलभता मिळणार आहे. जनतेच्या हितासाठी अशी कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने लोकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. महानगरपालिकेने यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असा ठाम पवित्रा जाहीर केला आहे.
-कुणाचीही गय केली जाणार नाही
सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रस्त्यांवर कोणतेही बांधकाम अधिकृत मंजुरीशिवाय केले तर ते तात्काळ हटविले जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मनपाने दिला आहे. सार्वजनिक जागा ही सर्व नागरिकांची आहे आणि ती वैयक्तिक वापरासाठी अडविण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा संदेशच एकप्रकारे मनपा प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button