डॉ. स्मिताताई देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार

32 वर्षांचा अध्यापन प्रवास

-15 वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ
-शिक्षण व संस्कृती क्षेत्रातील योगदानाची दखल
अमरावती / 14 सप्टेंबर : प्राचार्य डॉ. स्मिताताई रावसाहेब देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर होऊन त्यांच्या दीर्घकालीन सेवाभावी कार्याचा गौरव झाला आहे. शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या समर्पित योगदानाला हा पुरस्कार म्हणजे योग्य सन्मान ठरला आहे. 32 वर्षांचा अध्यापन व संशोधन अनुभव आणि तब्बल 15 वर्षांचा प्रभावी प्रशासकीय कार्यकाळ त्यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष देतो. राष्ट्रीय मूल्यमापन व मानांकन परिषद प्रक्रियेमधील यश, मदन मोहन मालवीय शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रातील पुढाकार, तसेच सामाजिक-सांस्कृतिक कार्य यामुळे त्या प्रामाणिक सेवाभावाच्या ओळख बनल्या आहेत.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाच्या पहिल्या महिला प्राचार्य म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे विद्यापीठ स्तरावर मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता, विद्वत परिषद व अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत राहिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय भाषांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य-विकास व कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले.
डॉ. स्मिताताईंचे नाव केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही. राजमाता जिजाऊ व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीत दिलेले योगदान त्यांच्या राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेची जाणीव करून देते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची नोंद झाली असून समाजसंस्कारासाठीचे त्यांचे कार्य प्रेरणादायी मानले जाते. पुण्याच्या विद्यानगरीत झालेला हा सन्मान हा विदर्भाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वारशाचा गौरव असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Back to top button