वायर व अ‍ॅल्युमिनियम सेक्शन चोरीचे सहा गुन्हे उघड

चार आरोपी अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

-गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमरावती / 12 सप्टेंबर : शहरातील बांधकामधारकांना हैराण करणार्‍या इलेक्ट्रिक वायर व अ‍ॅल्युमिनियम सेक्शन चोरीच्या मालिकेवर अमरावती गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून अंकुश बसवला आहे. गाडगे नगर, फ्रेजरपुरा, राजापेठ आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये झालेल्या सहा गुन्ह्यांचा उलगडा करीत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
12 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन संशयित आरोपींनी नुकत्याच झालेल्या इलेक्ट्रिक वायर चोरीच्या प्रकरणात सहभाग घेतला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामध्ये जाहीर खान उर्फ राजा नाडा जमीर खान (वय 31, रा. अकबर नगर, अमरावती) आणि शेख अजहरुद्दीन शेख अमरुद्दीन (वय 21, रा. अकबर नगर, अमरावती) या दोघांनी गाडगे नगर, फ्रेजरपुरा, राजापेठ व खोलापुरी पेठ हद्दीतील नव्या बांधकामावरील इलेक्ट्रिक फिटिंगमधून वायर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी ही वायर ओढून, तोडून चोरून नेल्याचे आणि त्यानंतर ती जाळून त्यातील तांबे विकल्याचेही सांगितले.
याचदरम्यान, चांगापुर मार्गावरील असोरीया पेट्रोल पंपासमोरील एका बंद गोडाऊनमधून अ‍ॅल्युमिनियम सेक्शन चोरून ऑटोमध्ये टाकले व यास्मिन नगर परिसरातील भंगार खरेदी विक्री करणार्‍या व्यक्तीकडे विकल्याचेही आरोपींनी कबूल केले. या गुन्ह्यातील भंगार खरेदीदार जियाउल हसन इमदाद अली (वय 63, रा. जमील कॉलनी, अमरावती) आणि अब्दुल वादेद अब्दुल मुजीब (वय 23, रा. जमील कॉलनी, अमरावती) यांनाही पोलिसांनी अटक केली. या कारवाईतून पोलिसांनी इलेक्ट्रिक वायरमधील तांबे 2 लाख 88 हजार रुपये किमतीचे तसेच अंदाजे एक क्विंटल वजनाचे अ‍ॅल्युमिनियम सेक्शन 50 हजार रुपये किमतीचे असा एकूण 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, गणेश शिंदे, घुगे व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस हवालदार सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोळ, जाहीर उद्दीन, पोलीस नाईक नजीमुद्दीन सय्यद, अतुल संबे, राहुल ढेंगेकर व पोलीस अंमलदार रंजीत गावंडे यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

Back to top button