गणेश विसर्जनात चाकूबाजी करणारे तिघे जेरबंद
हमालपुरा परिसरात युवकाला भोसकले

-दोघे यवतमाळमधून तर एकाला म्हाडा कॉलनीतून अटक
-राजापेठ पोलिसांची धडक कारवाई
अमरावती / 12 सप्टेंबर : शहरातील हमालपुरा परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री गणेश विसर्जन रॅलीदरम्यान झालेल्या धक्कादायक चाकूबाजीप्रकरणी राजापेठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. या हल्ल्यात संकेत संदीप जगताप (28) हा युवक गंभीर जखमी झाला होता. पोलिसांच्या जलद गतीने केलेल्या तपासातून आरोपींना दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली.
घटनेच्या दिवशी रात्री सुमारे 10 वाजता वीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन रॅली हमालपुरा येथील करण बारपासून सुरू झाली होती. संकेत जगताप आपल्या मित्र कृणाल नलवाडेसह व मंडळातील अन्य सदस्यांसोबत गुलाल उडवत आनंदात नाचत होता. त्याच वेळी बालवीर गणेशोत्सव मंडळाशी संबंधित सोनू आगाशे (35), पप्पू उर्फ प्रफुल कुबडे (30) व सूरज मोटे (30) हे तिघे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संकेत व कृणाल यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढताच तिघांनी संकेतची मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या कृणाललाही त्यांनी धमकावले. त्यानंतर सोनू आगाशेने अचानक चाकू काढून संकेतवर पेट, कंबर व छातीदरम्यान वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी आरडाओरडा केला आणि गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत संकेतला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसर्याच दिवशी सकाळी पीडित कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी करण बारसमोर ठिया आंदोलन छेडत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती.
पोलिसांनी सखोल तपासानंतर दोन आरोपींना यवतमाळ येथे जेरबंद केले, तर तिसरा आरोपी म्हाडा कॉलनी परिसरातून अटक करण्यात आला. सध्या तिन्ही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल असून, पुढील चौकशी सुरू आहे.




