आली ‘अलेक्सा शाळेला’, जि.प.चा नावीन्यपूर्ण उपक्रम
ग्रामीण विद्यार्थ्यांना अनोखा अनुभव

-कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शिक्षण
-दाभा येथील शाळेतून प्रारंभ
अमरावती / 11 सप्टेंबर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक व तंत्रज्ञानसंपन्न करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. ‘आली अलेक्सा शाळेला’ या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील निवडक जिल्हा परिषद शाळांना अलेक्सा डॉल्स व व्हर्च्युअल रिअॅलिटी युनिट्स उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमाची सुरुवात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने व आयसीआयसीआय बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षण विभागाला हे युनिट्स उपलब्ध झाले आहेत.
अलेक्सा विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे, सामान्य ज्ञान, कथा, कविता व विविध विषयांची माहिती देते. अनेक भाषांमध्ये संवाद साधता येत असल्यामुळे इंग्रजीसह इतर भाषांचे शिक्षण, उच्चारसुधारणा व संभाषणकौशल्य वाढण्यास मदत मिळते. मुलांना अलेक्सासोबत संवाद साधताना शिकणे अधिक खेळकर, परस्परसंवादी व सोपे होत आहे. याशिवाय अलेक्सावर मजेदार क्विझ घेतल्याने मुलांच्या अभ्यासात रस निर्माण होतो व त्यांचे ज्ञान तपासले जाते. कल्पनाशक्तीला चालना मिळण्यासाठी अलेक्सा कथाही सांगते.
निपुण भारत अभियानात विशेष कामगिरी करणार्या चांदसुरा, फॉरेस्ट मालूर, दहेन्द्री, वाठोडा बुद्रुक आणि पिंपळखुटा मोठा या पाच शाळांना शिक्षक दिनानिमित्त विभागीय आयुक्त व सीईओ यांच्या हस्ते अलेक्सा डॉल्स व व्हीआर युनिट्स वाटण्यात आले. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील एकूण 50 निवडक शाळांना या साधनांचा लाभ मिळणार आहे.
-विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाशी जवळीक
हा उपक्रम विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढवण्यासाठी, तंत्रज्ञानाची भीती दूर करण्यासाठी, इंग्रजी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळवून देण्यासाठी मोठा हातभार लावणार असल्याचे सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले. ग्रामीण शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असा आधुनिक उपक्रम राबवणारा अमरावती जिल्हा हा राज्यातील आदर्श ठरू लागला आहे.




