सोन्याच्या नावाखाली अचलपूरच्या व्यापार्‍याला 2 लाखांचा गंडा

खोदकामात मिळालेलं सोनं स्वस्तात विकण्याचा बहाणा

-दोन ठग फरार; नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती / 11 सप्टेंबर : स्वस्त सोन्याच्या नावाखाली अचलपूर येथील किराणा व्यापारी मुरारीलाल मदनलाल तांबी (52, चावलमंडी) यांना तब्बल 2 लाख रुपयांनी गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागपुरी गेट परिसरातील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. तांबी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नागपुरी गेट पोलिसांनी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दोन अनोळखी व्यक्ती किराणा खरेदीसाठी तांबी यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाने आपल्या जवळील पिवळ्या धातूसारखी वस्तू दाखवून सांगितले की, ते राजस्थानहून मजुरीसाठी आले असून रस्त्याची खुदाई करताना त्यांना सोन्यासारखी वस्तू मिळाली आहे. ती विकायची असल्याचे सांगून त्यांनी तांबी यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यावेळी एकाने आपले नाव राजूसिंह सांगत मोबाईल क्रमांक दिला.
31 ऑगस्टच्या रात्री 8 वाजता राजूसिंहने फोन करून सस्त्या सोन्याबाबत चौकशी केली. मुलाशी चर्चा करून तांबी यांनी सोनं घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता नागपुरी गेट चौकात भेटायचे ठरले. निर्धारित वेळी तांबी पिता-पुत्र मोटरसायकलने अमरावतीत पोहोचले. तेथे राजूसिंहसह त्याचा साथीदारही आला. शासकीय अध्यापक विद्यालयाजवळ त्यांच्याकडून काळ्या पिशवीत सोन्यासारखा हार देण्यात आला. त्याबदल्यात तांबी यांनी 2 लाखांची रोख रक्कम दिली. मात्र घरी पोहोचून पिशवी उघडताच तो हार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तांबी यांना फसवणुकीची जाणीव झाली.
ताबडतोब नागपुरी गेट पोलिस ठाण्यात तांबी यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांविरोधात भा.दं.वि. कलम 318(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button