एका क्लिकवर गुन्हेगारांचा ए टू झेड इतिहास
पोलिसांचा डिजिटल डोस

-गुंडांचा पत्ता लावणे झाले सोपे
-मनपा निवडणुकीपूर्वी पोलीसांचे ठोस पाउल
-20 जणांचे खास पथक सज्ज
अमरावती / 10 सप्टेंबर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक गुंडा-बदमाशाची ‘डिजिटल कुंडली’ तयार करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व गुन्हेगारांचे ए टू झेड रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध करण्याचे आदेश दिले असून, निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांचे विशेष पथक यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
या पथकात संगणक प्रणालीचे उत्तम ज्ञान असलेल्या 5 ते 6 तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्याद्वारे गुंडांच्या जन्मापासून आतापर्यंतचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास एकत्रित करून अद्ययावत केला जाणार आहे. एका बटनवर त्यांचे कारनामे पोलीस रेकॉर्डवर झळकतील. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमपीडीए, तडीपार, कारागृहातून सुटलेले बदमाश, तसेच जुन्या प्रकरणातील फाईल्स यांची छाननी केली जाणार आहे. यासाठी निरीक्षक संदीप चव्हाण यांचे पथक आयुक्तालय क्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन एक-एक फाईल तपासणार आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र कायद्यांअंतर्गत गुन्हे, बॉडी ऑफेन्स, भायगिरी, टोळ्या व त्यांचे प्रमुख यांच्या गुन्हेगारी कारवायांचा बारकाईने तपास होणार आहे.
-जन्मापासूनची कुंडली शोधणार
अद्ययावत माहितीमध्ये गुन्हेगाराचा जन्म कुठे झाला, कोणते गुन्हे दाखल आहेत, त्या प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे, संबंधित टोळ्या आजही सक्रिय आहेत की नाही, याचाही बारकाईने तपास केला जाणार आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा ही मोहीम युद्धपातळीवर राबवत असून, सर्व फाईल्सची चौकशी करून एकत्रित रिपोर्ट तयार केला जाणार आहे.




