पेट्रोल पंप संचालकाला लुटणारे दोघे जेरबंद, दोन फरार

‘टीप’ देणारा पंपावरील कर्मचारीच

-12 तासांत पोलिसांची कारवाई
अमरावती / 10 सप्टेंबर : चांदूर रेल्वे येथील अग्रवाल पेट्रोल पंपाचे संचालक चंपालाल नतमलजी अग्रवाल (75) यांच्यावर झालेल्या लुटीचा छडा पोलिसांनी केवळ 12 तासांत लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघे आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे लुटीची ‘टीप’ पेट्रोल पंपावरच काम करणार्‍या कर्मचार्‍याने दिली होती.
सोमवार, 8 सप्टेंबर रोजी रात्री चंपालाल अग्रवाल यांनी नवीन बसस्थानकाजवळील अग्रवाल सर्व्हिस सेंटर व मांजरखेड-अमरावती रोडवरील पेट्रोल पंपातील मिळून 2 लाख 81 हजार 298 रुपयांची रोकड जमा करून ती कारने घरी नेत होते. घराजवळ पोहोचताच मोटारसायकलवर आलेल्या तीन मुखवटाधारी लुटारूंनी त्यांच्याशी धक्काबुक्की करून पैशांची बॅग हिसकावून नेली. तक्रार दाखल होताच चांदूर रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला.
संशयित म्हणून पेट्रोल पंपावर काम करणार्‍या रोशन उर्फ राम रविंद्र चव्हाण (18, चांदूर रेल्वे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, पेट्रोल पंप मालक कोणत्या वेळेला आणि कशा प्रकारे पैसे नेतात, याची माहिती त्याने आपल्या साथीदारांना दिली होती. या ‘टीप’च्या आधारावर आरोपी शुभम गोपाल पवार (22, तळेगाव शामजीपंत) व त्याचे दोन साथीदार चांदूर येथे आले. त्यानंतर अग्रवाल यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून घराजवळच पैशांची लूट करून पळ काढला.
ही कारवाई चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजय आकरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक निरीक्षक शरद आहेर, उपनिरीक्षक रोहित कुदळे, नितेश आझडे, नंदलाल लिंगोट, पोलीस जवान शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम, योगेश नेवारे, प्रशांत ढोके, रविंद्र भुताडे, सागर पाचपोर, मुलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, मंगेश लाकडे, दिनेश कनोजिया, सचिन मसांगे व सागर धापड यांनी विशेष मेहनत घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button