सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा; युवतीवर अत्याचार
अश्लील फोटोद्वरे ब्लॅकमेल, पालकांना धमक्या

-लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादित
-अमरावती व इंदौरला वारंवार जबरदस्तीचे संबंध
अमरावती / 10 सप्टेंबर : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीवर वारंवार अत्याचार करून तिचे आपत्तिजनक फोटो पाठवीत ब्लॅकमेलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 30 वर्षीय रोहित विनय वर्मा (रा. विवेक कॉलनी, शिव मंदिरजवळ, अधारतल, जबलपूर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी बलात्कार, पोस्को, धमक्या व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत राहणार्या 27 वर्षीय पीडित तरुणीची वर्ष 2016 साली हायस्कूल काळात हाईक नावाच्या मेसेजिंग अॅपवर रोहित विनय वर्मा याच्याशी ओळख झाली. त्यानंतर रोहित वर्मा खासकरून अमरावतीला आला आणि विलासनगर येथे खोली भाड्याने घेऊन राहू लागला. या काळात त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा भेट घेतली. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. घटनेच्या वेळी एकदा पीडिता घरी एकटी असताना वर्माने तिच्या घरात घुसून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे पीडिता शिक्षणासाठी इंदौरला गेली असता, आरोपीने तेथेही दारूच्या नशेत तिच्याशी शिवीगाळ करत पुन्हा वारंवार जबरदस्ती केली. या कृत्यांना कंटाळून पीडितेने अखेरीस आपली हकिकत वडिलांना सांगितली.
ही बाब समजल्यावर रोहित वर्माने पीडितेच्या आईवडिलांशी वाद घालत त्यांना देखील शिवीगाळ केली आणि चाकूचा धाक दाखवून धमक्या दिल्या. केवळ एवढेच नव्हे, तर तरुणीच्या सहकार्यांमध्ये व तिच्या मैत्रिणीसमोर बदनामी केली. तिला तिची काही आपत्तिजनक छायाचित्रे पाठवून ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 64, 115(2), 352, 351, बाललैंगिक अपराध प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याचे कलम 8 व 12 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 69 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.




