चांदूर रेल्वेतील पेट्रोल पंप मालकाला घरासमोरच लुटले

2.81 लाखांची बॅग हिसकावून चोरटे पसार

-पोलिसांकडून सुरक्षची अग्रवाल यांची मागणी
चांदूर रेल्वे / 9 सप्टेंबर : चांदूर रेल्वे शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत अग्रवाल पेट्रोल पंपाचे मालक चंपालाल अग्रवाल यांच्याकडून तिघा अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 81 हजार 298 रुपयांची रोकड हिसकावून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी रात्री 11.00 ते 11.30 वाजताच्या सुमारास जिजामाता कॉलनी परिसरातील त्यांच्या घराच्या समोरच घडली.
चंपालाल अग्रवाल हे नेहमीप्रमाणे आपल्या पेट्रोल पंपावरून चारचाकी गाडीतून घरी येत असताना त्यांच्या हातातील पैशाची बॅग घेऊन घरात प्रवेश करण्याच्या क्षणीच तीन अज्ञात चोरट्यांनी अचानक हल्ला चढवून त्यांना धक्काबुक्की केली. झटापटीत अग्रवाल यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. या हल्ल्यात अग्रवाल यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली असून घटनेनंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
घटनेची गंभीर दखल घेत चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 309 (4), 3 (5) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शरद अहीर, नितेश आघाडे, पीएसआय रोहित कुदळे, पीएसआय नंदलाल लिंगोट, शिवाजी घुगे तसेच इतर पोलिस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. शहरातील व्यावसायिकांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच व्यापार्‍यांना योग्य ती सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. स्वतःवर झालेल्या या हल्ल्यानंतर चंपालाल अग्रवाल यांनीही पोलिसांकडून विशेष सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button