बीएलओंचे मानधन दुप्पट : 12 हजार रुपये मंजूर

पर्यवेक्षकांना मिळणार 18 हजार

-शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण
-दहा वर्षानंतर वाढ
अमरावती / 9 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या मानधनात तब्बल दुप्पट वाढ केली आहे. यापूर्वी दरवर्षी 6 हजार रुपये मानधन मिळणार्‍या बीएलओंना आता 12 हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर पर्यवेक्षकांना 12 हजारांच्या ऐवजी 18 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या वाढीला मान्यता दिली आहे.
सन 2014 नंतर प्रथमच बीएलओ व पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार बीएलओंना दरवर्षी 6 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. तसेच घराघर जाऊन पडताळणी केली, तर त्यासाठी अतिरिक्त 1 हजार रुपयांचे प्रोत्साहन मानधन मिळत होते. मात्र आता हे मानधन दुपटीने वाढविण्यात आले असून एईआरओ आणि ईआरओ यांनाही सुविधा व प्रोत्साहन वाढविण्यात आले आहे. बीएलओंना मतदारांची घरोघर जाऊन पडताळणी करणे, नवीन मतदारांच्या अर्जांची नोंदणी करणे, मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावे वगळणे, मतदार यादी अपडेट करणे, मतदारांना मतदान पावत्या वितरित करणे, तसेच मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे अशा विविध जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात.
राज्यातील बहुतांश बीएलओ हे शिक्षक वर्गातून निवडले जातात. त्यामुळे अध्यापनासोबत निवडणुकीचे काम सांभाळताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. याबाबत अनेकदा अध्यापक संघटनांनी हरकती घेतल्या असून, शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी टाकू नये अशी मागणीही केली आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी राजेश सावरकर यांनी सांगितले की, बीएलओंचे मानधन वाढविणे स्वागतार्ह आहे. मात्र अध्यापकांना निवडणुकीच्या कामात गुंतवणे चुकीचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तोटा होतो. सरकारने अध्यापकांव्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधावा.

संबंधित बातम्या

Back to top button