महिलेच्या दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास
नकली पोलिसांचा कहर!

-मॉर्निंग वॉक दरम्यान प्रकार
अमरावती / 9 सप्टेंबर : शहरात आणि ग्रामीण भागात नकली पोलिसांच्या नावाखाली महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना आज 9 सप्टेंबर रोजी सकाळी कॉलेज रोडवर घडली. सकाळी फेरफटका मारत असलेल्या महिलेच्या हातातील तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या बनावट पोलिसांनी लंपास केल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीत संबंधित महिलेने सांगितले की, ती रोजच्या प्रमाणे सकाळी कॉलेज रोडवर वॉकसाठी गेली होती. दरम्यान अचानक चार जण तिच्याजवळ आले. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगितले. त्यांच्यातील एकाने डमी पोलिस म्हणून महिलेचा विश्वास बसवण्यासाठी स्वतःचे दागीणे कागदात गुंडाळून ठेवले असल्याचे दाखवले आणि महिलेचे लक्ष वेधले. महिलेवर विश्वास बसल्यानंतर तिला देखील तिच्या सोन्याच्या बांगड्या काढून कागदात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. महिलेने तसे करताच बनावट पोलिसांनी हातचलाखीने सोन्याच्या बांगड्यांच्या ऐवजी नकली बांगड्या तिच्या हातात दिल्या आणि काही वेळातच पसार झाले. काही वेळाने फसवणुकीची जाणीव होताच महिलेने आरडाओरड केली.
महिलेने तात्काळ गाडगेनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींचे वर्णन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले असून तपासाला वेग देण्यात आला आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागातही या प्रकारच्या घटना सलग घडत असल्याने पोलिस प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांना घाबरवून किंवा पोलिस असल्याचे भासवून सोन्याचे दागिने लंपास करण्याचा हा प्रकार वाढता असून पोलिसांनी तातडीने या टोळीला जेरबंद करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.




