14 चाकी ट्रकमधून 50 पेक्षा अधिक गोवंशांची सुटका
लालखडीत नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

-चिखलात अडकला ट्रक, चालकाचे पलायन
अमरावती / 9 सप्टेंबर : लालखडी परिसरात आज मंगळवारी दुपारी नागपुरी गेट पोलिसांनी 14 चाकी ट्रक पकडून निर्दयतेने कोंबून नेण्यात येत असलेल्या 50 पेक्षा अधिक गोवंशांची सुटका केली. पोलिसांना पाहताच चालक ट्रक घेऊन वेगाने पळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र ट्रक रहिवासी भागात चिखलात अडकल्याने चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने अडकलेला ट्रक बाहेर काढून ताब्यात घेतला. सर्व गोवंशांना सुरक्षितपणे गोरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले.
नागपुरी गेट पोलिस ठाण्याचे थानेदार उरलागोंडावार यांना माहिती मिळाली होती की एमएच 34/बीजी 3625 क्रमांकाचा 14 चाकी ट्रक मोठ्या संख्येने गोवंशांना कत्तलखान्याकडे घेऊन जात आहे. यावरून नव्याने गठीत डीबी स्क्वॉडचे हेड कॉन्स्टेबल पिंपळे तसेच जवान शेखर गायकवाड, प्रवींद्र, सफीक, कुणाल बरडे यांच्या पथकाने लालखडी मार्गावर गस्त वाढवली. दरम्यान संशयित ट्रक दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रकचा वेग वाढवून पळ काढला.
लालखडी परिसरातील रहिवासी भागातून जाताना ट्रक चिखलात अडकला. बराच प्रयत्न करूनही तो बाहेर निघू शकला नाही. त्यामुळे चालकाने गाडी सोडून पळ काढला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता आत 50 पेक्षा अधिक गोवंश निर्दयतेने बांधून कोंबलेले आढळले. तातडीने नागरिकांच्या मदतीने गोवंशांना बाहेर काढून सुरक्षित गोरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले. सदर ट्रक पोलिसांनी जप्त केला असून गाडीतून गोवंश तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अडकलेला ट्रक जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.




