सर्पदंश झालेल्या 17 वर्षीय तरुणाचे प्राण वाचले
सुपर स्पेशालिटीतील डॉक्टरांची तत्परता

अमरावती / 8 सप्टेंबर : चांदूर रेल्वे येथे सलूनमध्ये काम करत असताना 17 वर्षीय मुलाच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. या घटनेनंतर त्याला तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यावेळी मुलाची प्रकृती अत्यवस्थ होती. उपस्थित डॉक्टरांनी तत्परतेने उपचार सुरू केले. सापाच्या विषामुळे त्याच्या मूत्रपिंडावर परिणाम झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) हलविण्यात आले.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यासाठी डायलिसिस करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. नेफ्रोलॉजी विभागातील डॉक्टरांनी आवश्यक ती सर्व उपचारपद्धती तत्काळ राबवली. डायलिसिस देऊन रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. काही दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णाची तब्येत सुधारत गेली. अखेर तो पूर्णपणे बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
वेळीच उपचार मिळाल्यामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले. डॉक्टर हेच खरे देवदूत आहेत, याची प्रचिती आम्हाला आली, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफ्रोलॉजिस्ट डॉ. कोकाटे, डॉ. विक्रांत कुडमेथे, डॉ. नाहिद, डॉ. प्रियंका, डॉ. श्रद्धा जाधव तसेच अतिदक्षता विभागातील परिचारिकांनी उपचारात मोलाची भूमिका बजावली.




