वसंत आबाजी डहाके व समीर सराफ यांचा गौरव

प्रा. राम शेवाळकर आधारवड पुरस्कार जाहिर

-12 सप्टेंबरला अमरावतीत भव्य सोहळा
-प्रख्यात विचारवंत व मान्यवरांची उपस्थिती
अमरावती / 8 सप्टेंबर : विचारवंत, साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या प्राचार्य राम शेवाळकर प्रतिष्ठान, नागपूर तर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर आधारवड पुरस्कार जाहीर झाला आहे. 2024 चा पुरस्कार प्रख्यात साहित्यिक व 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तर 2023 चा पुरस्कार ‘आदित्य अनंत’ या संस्थेचे संस्थापक समीर सराफ यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सायं. 5.30 वाजता अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसदकर सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य कार्यकर्ते तसेच विधानपरिषद सदस्य संजय खोडके भूषविणार आहेत. प्रख्यात समीक्षक, विचारवंत व 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या वसंत आबाजी डहाके यांनी साहित्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण लेखन करून साहित्यिक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, तर समीर सराफ यांनी ‘शून्यातून विश्व निर्माण’ करत 200 हून अधिक कर्मचारी व 3500 कुटुंबांना ‘आदित्य अनंत’ या संस्थेमार्फत प्रत्यक्ष कार्यरत ठेवून सामाजिक क्षेत्रात अनुकरणीय कार्य घडवले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, आशुतोष शेवाळकर, विलास मानेकर, संदीप जोशी, डॉ. बबनराव तायवाडे, निलेश खांडेकर, ज्योत्स्ना पंडित, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. परिणय फुके, अ‍ॅड. अभिजीत वंजारी, प्रदीप दाते, डॉ. राजाभाऊ टाकसळे, माधव देशपांडे, संजय पैडलवार, कार्तिक शेंडे, दीपक निलावार, सलील शेख यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिनेश बुब, अभिनाश दुधे, प्रदीप देशपांडे, प्रा. डॉ. मोना चिमोटे, हेमंत खडके, सुनिल यावलीकर, डॉ. सुभाष गवई, सुनील जयवंत देशमुख, वैभव दलाल, अतुल गायगोले, गजानन तिरमनवार, प्रा. विकास अडलोक, रेवन पुसदकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button