नियमबाह्य बांधकाम व फायर ऑडिटविना व्यवसाय!

शहरातील बाजारपेठा मनपाच्या रडारवर

-महापालिका तपासणार परवानग्या
-परवाना विभागाला आयुक्तांचे आदेश
अमरावती / 2 सप्टेंबर : शहरातील व्यापारी आस्थापनांना आता मनपाच्या तपासणीची झळ बसणार आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सर्व व्यावसायिक इमारती, हॉटेल्स, दवाखाने, मार्केट व मंगल कार्यालयांच्या बांधकाम परवानग्या तसेच फायर ऑडिटची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नुकत्याच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील बजाज खिलौना या दुकानात सलग दुसर्‍यांदा लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
बजाज खिलौना या दुकानात काही महिन्यांपूर्वीच मोठी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रविवारी पुन्हा भीषण आग लागून संपूर्ण दुकानातील माल खाक झाला. या घटनेचा गंभीरपणे विचार करत आयुक्तांनी बाजार परवाना विभागाला कठोर निर्देश दिले. प्राथमिक तपासात उघड झाले की, बजाज खिलौना सहित संपूर्ण मार्केट नझूलच्या जागेवर उभारण्यात आले असून त्याला बांधकाम परवानगीच नाही. इतकेच नव्हे तर या मार्केटसह शहरातील अनेक ठिकाणी फायर ऑडिटही करण्यात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर मनपा आता सर्व बाजारपेठा, व्यापारी संकुले व प्रतिष्ठानांची बांधकामासंबंधी कागदपत्रे व फायर ऑडिटची नोंद तपासणार आहे. नियमबाह्य बांधकामे व परवानग्यांविना सुरु असलेले व्यवसाय उघडकीस आल्यास कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शहरातील प्रत्येक मार्केटचे दस्तऐवज तपासणीसाठी मागवले जाणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनपा शिस्त मोहीम राबवणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button