बडनेरा स्थानकावर नवे प्रशस्त तिकीट काउंटर सुरू

अत्याधुनिक सुविधा, प्रवाशी सुखावले

-नवी इमारत आकर्षणाचे केंद्र
-दिव्यांग व ज्येष्ठांसाठी वेगळी सोय
अमरावती / 1 सप्टेंबर : हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या बडनेरा जंक्शनला ‘अमृत-2’ योजनेत समाविष्ट करून रेल्वे प्रशासनाने विकासकामांना वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर येथील नवनिर्मित तिकीट बुकिंग इमारतीचा आज (1 सप्टेंबर) शुभारंभ झाला. सहा नव्या खिडक्या, मोबाइल चार्जिंग पॉईंट्स, डिस्प्ले बोर्ड यांसारख्या आधुनिक सुविधा मिळाल्याने प्रवासी सुखावले आहेत.
नवीन इमारतीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया जलद होणार असून प्रवाशांना ताटकळावे लागणार नाही. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेर्‍याखाली असल्याने बोगस दलाल व अवैध तिकीट विक्रेत्यांवर अंकुश बसणार आहे. यामुळे प्रामाणिक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. बडनेरा स्थानकावरील नव्या इमारतीने महिला प्रवासीही आनंदी झाल्या आहेत. रोज चालणार्‍या गाड्यांमुळे आरक्षणातील अडचणी दूर झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. नवीन इमारत, लिफ्ट, एस्कलेटर व स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त करून या सुविधा जपण्याची जबाबदारी सर्व प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नव्या तिकीट काउंटरमुळे बडनेरा स्थानक प्रवाशांसाठी सुरक्षित, सुलभ व विश्वासार्ह ठरणार असून रेल्वे प्रशासनाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. रेल्वे प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकीची सोय केली आहे. त्यामुळे त्यांना होणारा त्रास कमी होईल. काही प्रवाशांनी उद्घाटनापुरते न थांबता सातत्याने स्वच्छता व सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button