शेतात विज कोसळली, म्हैस ठार
गुराखी थोडक्यात बचावला

-चांदुर बाजार तालुक्यातील घटना
चांदूर बाजार / 28 मे : चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावाच्या शिवारात मंगळवारी सायंकाळी एका शेतात वीज कोसळल्याने एका गर्भवती म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गुरे चारत असलेला गुराखी युवक थोडक्यात बचावला. माधान येथील रहिवासी असलेले गरीब शेतकरी किसनराव भारकडे यांच्या मालकीची ही म्हैस होती. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
किसनराव भारखडे यांचा मुलगा राजू भारखडे हा त्याच्या घरीची म्हैस चराईसाठी माधान शिवारात असलेल्या काठू मोहोड यांच्या पडीत शेतात घेउन गेला होता. त्याचवेळी अचानक विजेचा कडकडाट व वादळी वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राजूसह यावेळी शेतात असलेले इतर लोक आडोशाला गेले. म्हैस शेतातच चरत असताना तिच्या अंगावर वीज कोसळली. त्यात म्हैस जागेवरच गतप्राण झाली. या दुर्घटनेत राजू भारखडे आणि अन्य लोक सुदैवाने थोडक्याच बचावले. विशेष म्हणजे, ही म्हैस 9 महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे भारखडे यांचे या घटनेमुळे दुहेरी नूकसान झाले आहे.
या घटनेनंतर परिसरात शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किसनराव भारखडे यांच्या कुटुंबाकरिता म्हैस हे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे. आपल्याला शासनाकडून नूकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.