महावितरणच्या कार्यालयात रंगला लाखोंचा जुगार!

पोलिसांच्या कारवाईत फक्त 6 हजार 900!

-गावभर कुजबुज, पोलिसांच्या कथनावर प्रश्नचिन्ह
-डझनभर जुगारी, गुन्हा फक्त दोघांवर!
तिवसा / 27 ऑगस्ट : बैलपोळ्याच्या रात्री मोझरी-गुरुदेवनगरात असा थरार रंगला की, नागरिक थक्कच झाले. महावितरणच्या कार्यालयातच लाखोंचा जुगाराचा डाव फुलला होता. खबर्‍याच्या माहितीनंतर तिवसा पोलिसांनी धाड टाकली आणि क्षणार्धात पत्त्यांचा खेळ उधळला. मात्र गावकर्‍यांना धक्का बसला तो कागदोपत्री दाखवलेल्या आकड्याने. लाखोंचा डाव आणि जप्त रक्कम फक्त 6 हजार 900 रुपये!
बिट जमादार चार जवानांसह धाडीस पोहोचताच जुगार्‍यांत पळापळ सुरू झाली. धडपडीत दोन जण गंभीर जखमी होऊन दवाखान्यात दाखल झाले. घटनास्थळावरून रोख, मोबाईल, दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. परंतु अहवालात दाखल झाली ती केवळ 6,900 रुपयांची रक्कम. त्यानंतर गावभर चर्चा सुरू झाली. संपूर्ण खेळ पाचशेच्या नोटांतच होत होता. शंभरचं नावही नव्हतं. तरी पोलिसांच्या पंचनाम्यात 6,900 हा आकडा कसा नोंदला गेला? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, या कारवाईबाबत तिवसा पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली. घटनास्थळी जे आरोपी व साहित्य मिळाले त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची व चर्चेची सखोल चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
धाडीत चार मोबाईल हस्तगत झाले, पण मुद्देमालात त्यांचा उल्लेखच नाही. त्यामुळे कारवाईत काहीतरी ‘गोलमाल’ झाल्याची चर्चा आहे. घटनास्थळी डझनभर लोक सहभागी असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला फक्त दोघांवर. बाकी सर्वांना अज्ञात आरोपी फरार दाखवण्यात आलं. याबाबत गावकर्‍यांचा सूर वेगळाच आहे. उलट तपासणी झाली तर बिट जमादाराचाच ‘प्रामाणिकपणा’ उघडा पडेल, अशी कुजबुज सर्वदूर पसरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button