चाकू हल्ल्यात शेतकरी ठार, आरोपी गजाआड

पोलिसांचा झटपट तपास, 24 तासांत छडा

-सालोरा-धोत्रा मार्गावरील घटनेने खळबळ
कुर्‍हा / 27 ऑगस्ट : सालोरा-धोत्रा मार्गावर घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाची अवघ्या 24 तासांत उकल करून कुर्‍हा पोलिसांनी आरोपीला थेट गजाआड केले. गुप्त माहिती आणि पोलिसांच्या तातडीच्या हालचालींमुळे या रक्तरंजित हत्याकांडातील रहस्य फार काळ टिकू शकले नाही.
26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात इसमाने एका इसमावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती पोलीस पाटील धोत्रा यांनी कुर्‍हा पोलिसांना दिली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. सालोरा ते धोत्रा मार्गावर गंभीर अवस्थेत पडलेल्या इसमाला तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चौकशीत मृताची ओळख शिवा सोना राठोड (55, रा. सालोरा तसरे) अशी पटली. घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. याचदरम्यान प्रेमसिंग दशरथ चव्हाण (42, रा. सालोरा तसरे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी खुनाचा धागा पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या टिपवर आणि स्थानिक साक्षीदारांच्या माहितीवर पोलिसांनी संशयित श्रीकृष्ण भिकु राठोड (40, रा. सालोरा तसरे) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत अखेर त्यानेच शिवा राठोड याचा खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी, चांदुर रेल्वे अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष अंमलबजावणीत कुर्‍ह्याचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे, एएसआय सोमेश्वर सपाटे, पोहेकॉ उमेश वाघमारे, अनिल निंगोट, पोकॉ दर्पण बनसोड, हेमंत डहाके व चालक सागर निमकर सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button