हत्याकांडाचा उलगडा : अतुल पुरी खून प्रकरणात साळा ‘मास्टरमाइंड’

बहिणीच्या छळाचा बदला घेण्यासाठी रक्तरंजित कट

-पाच लाखांत सुपारीचा सौदा, आणखी चौघांना अटक
-गुन्हे शाखेचे यश, आठ आरोपी गजाआड, एक फरार
अमरावती / 27 ऑगस्ट : बडनेरा येथे शुक्रवारी घडलेल्या अतुल पुरी खून प्रकरणात पोलिसांनी मोठा धागा उलगडला आहे. कौटुंबिक वादातून जन्माला आलेल्या या रक्तरंजित कटामागे मृतकाचा साळा व त्याचा मित्रच मास्टरमाइंड असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. पाच लाखांत झालेल्या सुपारीच्या सौद्यातून दोन लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. याप्रकरणात आज मास्टरमाइंडसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या तपासातून आठ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, एक आरोपी फरार आहे. राहुल भगवंत पुरी (36, माणीकवाडा, ता. नेर, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य मास्टमाइंडचे नाव आहे.
22 ऑगस्ट रोजी बडनेरा जुनीवस्ती परिसरात रेल्वे स्टेशनपासून थोड्याच अंतरावर पवार वाडीच्या रस्त्यावर अतुल पुरी याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. क्षणात त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरात हत्येची वार्ता पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. प्रारंभी अंधुक धाग्यांच्या आधारे दोन आरोपी व तीन विधी संघर्षित बालकांना अटक करण्यात आली. पण हा फक्त गुन्ह्याचा पृष्ठभाग होता; मूळ मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाताबाहेर होता.
मृतक अतुल पुरी गेल्या काही वर्षांपासून आपल्या पत्नीला शारीरिक व मानसिक छळ देत होता. यातून वैवाहिक जीवन नरक बनले होते. बहिणीच्या होत असलेल्या यातनांना कंटाळून तिचा भाऊ राहुल भगवंत पुरी संतप्त झाला. जावाई अतुल पुरीला धडा शिकवायलाच हवा या निर्णयावर पोहोचून त्याने मित्र प्रशांत भास्करराव वर्हाडे (42, माणीकवाडा, ह. मुक्काम पार्वती नगर, अमरावती) याला विश्वासात घेतले.
यानंतर दोघांनी आपल्या ओळखीच्या अक्षय प्रदीप शिंपी (30, गणेडीवाल लेआउट, अमरावती) आणि गौरव गजानन कांबे (29, राठी नगर, अमरावती) यांच्याकडे संपर्क साधला. पाच लाख रुपयांचा सौदा ठरला. त्यातील दोन लाख तात्काळ देऊन अतुल पुरीला संपविण्याची जबाबदारी देण्यात आली. अक्षय व गौरव यांनी पुढे हा गुन्हा अंमलात आणण्यासाठी स्थानिक पातळीवरील तरुणांना हाताशी घेतले. यामध्ये साहिल उर्फ गोलू हरी मोहोड (19), सक्षम विजय लांडे (19) आणि तीन विधी संघर्षित बालक सामील झाले. खुनासाठी दोन लाख रुपयांची सुपारी त्यांना देण्यात आली. या पाच जणांनी नंतर अतुल पुरीच्या खूनाची योजना प्रत्यक्ष अंमलात आणली.
या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, कौटुंबिक वाद किती भयावह रूप घेऊ शकतो. बहिणीवरील छळामुळे पेटलेल्या भावाच्या मनात सूडाची आग पेटली आणि अखेर तो कट खूनापर्यंत पोहोचला. साळा-जावयाचा वाद इतका टोकाला जाऊन जीवघेणा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. सध्या या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींपैकी आठ आरोपी गजाआड आहेत, तर मास्टरमाइंडपैकी एक अक्षय शिंपी अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेनंतर या हत्याकांडाची संपूर्ण कहाणी उघड होण्याची शक्यता आहे. बडनेरा हत्याकांडाने बडनेरा-अमरावती शहरात खळबळ उडवली आहे.
-गुन्हे शाखेचा धडाकेबाज तपास
ही हत्या पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली होती. तपासाची सूत्रे गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या हातात आली. अथक प्रयत्न आणि पद्धतशीर तपासातून पोलिसांनी एकामागून एक धागे जुळवले. अखेर कटाचा मास्टरमाइंड हाती लागला. राहुल पुरी, प्रशांत वर्हाडे आणि गौरव कांबे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, अक्षय शिंपी फरार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
-पोलिस दलाचे कौतुकास्पद यश
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सातत्याने प्रयत्न केले. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम घुगे, उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे शाखा) रमेश धुमाळ, एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची गाडी पुढे सरकली. गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल कडू, मनीष वाकोडे, महेश इंगोले, अनिकेत कासार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तर अंमलदार सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, सचिन बहाडे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, नईम बेग, विकास गुडधे, नाझिमोद्दीन, विशाल वाकपांजर, राहुल ढेंगेकर, राजीक रायलीवाले, रंजीत गावंडे, सुरज चव्हाण, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा, अलीमोद्दीन खतीब यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

संबंधित बातम्या

Back to top button