वाहतुकीवरील संकट निवारणासाठी खोडकेंची पुढाकार

प्रशासनावर दबाव वाढला, उपाययोजना योजणार

-गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
-नव्या पुलाच्या नियोजनावरही चर्चा होणार
अमरावती / 26 ऑगस्ट : राजकमल चौकातील रेल्वे ओव्हरब्रिज अखेर वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिक अक्षरशः कोंडीत अडकले आहेत. रविवार 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातल्याने सोमवार पहाटेपासून राजकमल चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक आणि मालवीय चौक या मार्गांवर गाड्यांच्या अखंड रांगा लागल्या. बस, रुग्णवाहिका, दुचाकी, शालेय वाहनं या सगळ्यांना तासनतास अडकावे लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या उड्डाणपुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल धोकादायक घोषित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईने पूल बंद करण्याचे आदेश दिले. जड वाहनांना महिना-पंधरा आधी थांबवण्यात आले होते, मात्र आता सर्वतोपरी वाहतूक थांबवल्याने शहरचर्या विस्कळीत झाली आहे. वृद्ध आजारी रुग्णांना रुग्णालय गाठण्यात अडचणी येत आहेत, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज गाठणे कठीण झाले असून व्यापार्‍यांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत.
शहरवासीयांचा हा आक्रोश लक्षात घेऊन आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी थेट पुढाकार घेतला असून, गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासन, शहर पोलीस आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुलाचा पर्याय म्हणून तात्पुरती वाहतूक व्यवस्था, गणेशोत्सव काळात वाढणारी गर्दी नियंत्रित ठेवण्याची यंत्रणा आणि दीर्घकालीन उपाय म्हणून नवा पूल उभारण्याची आखणी यावर चर्चा होणार आहे.
नागरिकांवर आलेला हा आकस्मिक वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत काही प्रमाणात प्रयत्न केले असले तरी तातडीचे निर्णय घेणे अत्यावश्यक ठरत आहे. प्रशासनावरचा दबाव वाढविण्यासाठी खोडकेंनी थेट संपर्क साधल्याची माहिती आहे. शहरवासीयांच्या हालअपेष्टा कमी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार आमदारांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button