ठाकरे बंधूंचं एकमत; युतीकडे वाटचाल?

हिंदी सक्तीपासून व्होट चोरीपर्यंत एकमत

मुंबई / 25 ऑगस्ट : महाराष्ट्रातील दोन मोठे नेते – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – जवळपास 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. सुरुवात हिंदी सक्तीच्या मुद्द्यापासून झाली होती, तर आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या व्होट चोरीच्या आरोपालाही दोन्ही बंधूंनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीत भाजपाने मतं चोरल्याचा दावा केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही टीका केली. तर राज ठाकरेंनी याची चौकशी व्हायलाच हवी असं म्हणत गांधींच्या आरोपाला दुजोरा दिला. यामुळे दोन्ही बंधूंच्या राजकीय भूमिकेत सारखेपणा स्पष्ट झाला आहे.
गेल्या महिन्यात राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आले होते. आता नवीन मुद्द्यावर एकमत झाल्याने शिवसेना (ठाकरे) व मनसे युतीचे अंदाज अधिक बळ घेऊ लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक वजन आहे. मराठी मतदारांमध्ये व शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांत बंधूंनी एकत्र यावं अशी तीव्र अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांकडून मिळत असलेला सकारात्मक सूर आणि सतत जुळणारे विचार हे युतीकडे टाकलेलं भक्कम पाऊल मानलं जात आहे. येत्या काही महिन्यांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button