निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मोर्चा, तहसिलवर धडक
7-8 महिन्यांपासून मानधन थकले

-तहसिलदारांच्या आश्वासनावर आंदोलन स्थगित
-गांधी जयंतीला तिव्र लढ्याचा इशारा
चांदूर रेल्वे/ 25 ऑगस्ट : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्तींना असणार्या योजनांचे मासिक मानधन गेल्या सात-आठ महिन्यांपासून खात्यावर जमा न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांनी सोमवारी चांदूर रेल्वे तहसिल कार्यालयावर ठिय्या देत जोरदार आंदोलन छेडले. आम आदमी पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (से.) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चामुळे संपूर्ण तहसिल परिसर घोषणांनी दणाणून गेला.
अग्रवाल धर्मशाळेजवळून सकाळी निघालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने टांग्यावरून तहसिल कार्यालयात दाखल झाला. कार्यालयासमोर झालेल्या बैठा सत्याग्रहात ‘मानधन आमचा हक्क आहे’, ‘थगीला आम्ही बळी पडणार नाही’, अशा घोषणांनी वातावरण भरून गेले. मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी तहसिलदार पुजा माटोडे यांच्या दालनासमोर ठिय्या दिल्याने प्रशासन अक्षरशः घामाघूम झाले. शेवटी, तहसिलदारांशी झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, लाभार्थ्यांना एक ऑक्टोबरपर्यंत मानधनाचा हक्काचा पैसा न मिळाल्यास दोन ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) रोजी यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
तालुक्यातील शेकडो लाभार्थी या योजनांखाली नोंदणीकृत असून गेल्या काही महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी तहसिलदारांना निवेदन दिले असतानाही थकीत रक्कम न मिळाल्याने अखेर रस्त्यावर उतरावे लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर तहसिलदार पुजा माटोडे यांनी तहसिल कार्यालयात विशेष ‘संजय गांधी-श्रावणबाळ कक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली. लाभार्थ्यांचे आधार सिडिंग, बँक लिंकींग यावर काम सुरू असून थकीत अनुदानासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मोर्चाचे नेतृत्व आपचे नेते तथा माजी न.प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी केले. यावेळी आप पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. वसंतराव ढोके, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष मनोज कडू, भाकप व माकपचे नेते, विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेकडो लाभार्थी उपस्थित होते.




