डॉक्टरांवर रुग्ण व नातलगांचा हल्ला

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात गोंधळ

नांदगाव खंडेश्वर / 24 ऑगस्ट : सरकारी सेवेत कार्यरत असताना एका डॉक्टरांवर रुग्णाच्या नातलगांनी हल्ला करून त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. मयूर केदार कुमार कोलकर (वय 28) हे ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना आरोपी लोकेश भस्मे (वय 26, रा. येनस), त्याचा भाऊ आणि एक मित्र असे तिघे रुग्णालयात आले. फिर्यादी डॉक्टर एका रुग्णाला उपचार देत असताना आरोपी लोकेश भस्मे याला साप चावल्याने दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी आधी एका रुग्णाला सलाईन लावून दुसर्‍या पेशंटकडे पाहण्यासाठी गेले. दरम्यान, आरोपीने आमच्या पेशंटकडे आधी लक्ष द्या असे म्हणून डॉक्टरांशी उलटसुलट वाद घातला. इतकेच नव्हे तर त्याने फिर्यादी डॉक्टरांचा मान पकडून धक्काबुक्की केली व पाहून घेतो अशा शब्दांत धमकी दिली. या प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली व डॉक्टरांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी सेवकांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचा व मारहाणीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button