अपघातात आशा वर्करचा मृत्यू; तिवस्यात शोककळा

सुरवाडी खुर्द येथे दुचाकीने दिली धडक

तिवसा / 24 ऑगस्ट : तिवसा राष्ट्रीय महामार्गाजवळील सुरवाडी खुर्द येथील सर्व्हिस रोडवर आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या 45 वर्षीय आशा वर्कर सौ. ललिता अतुल शेळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, दि. 16 रोजी सौ. ललिता शेळके आपल्या मुलीसह घराच्या दिशेने सर्व्हिस रोडवरून जात होत्या, त्यावेळी मागून येणार्‍या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली. यामुळे त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्वरित त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले गेले, आणि नंतर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्यात आले. आठ दिवस उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने आज सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले.
सौ. ललिता शेळके मागे पती, एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंबीय ठेवून गेल्या आहेत. त्यांचा अंत्यविधी सुरवाडी येथील स्मशानभूमीत झाला. यावेळी परिसरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. तालुक्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात आणि स्थानिक समाजात त्यांच्या दुर्दैवी निधनाने शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button