प्राध्यापकाच्या निर्घुन खुनाने बडनेरात खळबळ

जुनीवस्तीत रेल्वे स्थानकानजीक घटना

-तिघांचा धारदार हत्यारांनी हल्ला
-आरोपी फरार, खुनाचे कारण अस्पष्ट
बडनेरा / 22 ऑगस्ट : अमर कॉलनी येथील रहिवासी प्रा. अतुल नामदेव पुरी (40) यांचा बडनेरा जुनिवस्ती परिसरात रेल्वे स्थानकानजीक असलेल्या तिलक नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी रात्री घराकडे परतत असताना तीन अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने तब्बल 10 ते 12 वार करत पुरी यांची जागीच हत्या केली. पहाटे स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला रक्ताने माखलेला त्यांचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
प्रा. अतुल पुरी हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी ते रेल्वेने नांदुरावरून बडनेरा येथे परतले होते. त्यानंतर स्वतःच्या दुचाकीवरून (एमएच-27/सीएल-1708) माताफैल मार्गे तिलक नगर रोडने पवारवाडीच्या दिशेने जात होते. या दरम्यान तिघांनी घातपात करून त्यांचा मार्ग अडवला आणि धारदार चाकूंनी सपासप वार केले. वार इतके तीव्र होते की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटना कळताच सहाय्यक पोलिस आयुक्त कैलाश पुंडकर, गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण तसेच बडनेरा ठाण्याचे प्रभारी सुनील चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. यावेळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ व डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासाला सुरुवात झाली. या खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही आरोपींचा शोध घेण्यासाठी बडनेरा पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. शहरात झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button