करजगावात सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त

आरोपी कार मालक फरार

-ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 22 ऑगस्ट : ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे करजगाव येथे धाड टाकत मोठी कारवाई केली. गावातील एका घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी इको (क्रमांक एमएच-27/बीव्ही-8487) या वाहनातून तब्बल 2 लाख 29 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच वाहनमालक विनोद उर्फ विनायक अशोकराव काळे (37, रा. करजगाव) हा घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला गस्ती दरम्यान गुप्त माहिती मिळाली की, करजगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी एका इको कारमधून अवैधरीत्या वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता सदर वाहन करजगाव येथील विनोद काळे यांच्या घरासमोर उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच काळे पसार झाला. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता मागील सीटवर ठेवलेल्या सात पोत्यांमध्ये गुटख्याचा प्रचंड साठा आढळून आला. हा साठा व वाहन मिळून एकूण 11 लाख 29 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास करजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय विशाल रोकडे, पोलिस कर्मचारी संतोष तेलंग, दीपक पाल, राजेश कासोटे, दीपक पाटील व किशोर सुने यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button