मोर्शी पोलिसांचे जुगार अड्ड्यांवर छापे!
18.46 लांखांचा मुद्देमाल जप्त

-फरार आरोपींचा शोध सुरू
मोर्शी / 22 ऑगस्ट : पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर मोर्शी शहरासह हिवरखेड परिसरात अवैध जुगारधंद्यावर मोर्शी पोलिसांनी छापे मारुन 18 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, अनेक आरोपी रंगेहात पकडले गेले आहेत. काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा शोध मोर्शी पोलीस घेत आहेत.
पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार धाड टाकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळा व गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी पोलिस स्टेशन हद्दीत येणार्या अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. पहिली कारवाई मोर्शी शहरातील रामजीबाबा नगर परिसरात करण्यात आली. येथे आज जुगार अड्ड्यावर धाड टाकली. आरोपी राजेंद्र किसनसिंग बावरी, अविनाश महादेव जाधव, किशोर सदाशिवराव दाबेराव, अक्षय सुरेशराव गुजर, प्रमोद नागोराव भगेवार, शुभम राजेंद्र चिंचोळकर यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याकडून नगदी 6,850, 4 मोबाईल किंमती 55,000, तसेच 5 मोटरसायकल किंमती 4,90,000 असा एकूण 14,52,850 चा मुद्देमाल जप्त केला गेला.
दुसरी कारवाई गोपनिय माहितीवरून हिवरखेड गावात करण्यात आली. येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. आरोपी सुरेंद्र वसंतराव डायलकर, विष्णु लक्ष्मण पाचारे, निलेश किसनराव भेंडे, शेख राजीक शेख साबीर यांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून नगदी 12,970, 7 मोबाईल किंमती 1,00,000 आणि 3 मोटरसायकल किंमती 2,80,550 असा एकूण 3,93,520 चा मुद्देमाल जप्त झाला. या कारवायांमुळे अवैध जुगारधंद्यांवर बचक बसेल अशी अपेक्षा आहे. तरीही काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन मोर्शी डी.बी. पथकाच्या सदस्यांनी केली. पोलीस अमलदार छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे यांचा यात सहभाग होता.




