कापूसतळणी रस्त्यावर दारू दुकान कर्मचारी लुटले

50 हजारांचा मुद्देमाल गायब

-अनोळखी तिघांनी केली मारहाण
अंजनगाव सुर्जी / 22 ऑगस्ट  : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्राम कापूसतळणी येथे गुरुवारी रात्रीच्या वेळी देशी दारू दुकानातील कर्मचारी निलेश शिवणकर आणि बुदेले यांच्यावर तीन अनोळखी युवकांनी हल्ला करून 50,000 रुपयांची रोकड लुटली.
घटना अशी की, अंजनगाव येथील विजय जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानात दिवसभर व्यवसाय करून कर्मचारी परत अंजनगावकडे जात असताना, कापूसतळणीपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर पोही नाल्याजवळील लढ्ढा यांच्या शेतासमोरच्या पुलावर लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी निलेश शिवणकर यांना काठीने मारहाण केली आणि त्यांच्याजवळची रोकड हिसकावून ते फरार झाले.
घटनेची तक्रार मिळताच अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी तातडीने परिसराची नाकाबंदी केली. उपनिरीक्षक अनिल चांदोरे आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र आरोपींनी पोलीसांना हुलकावणी दिल्यामुळे रात्री तीन वाजेपर्यंत त्यांचा मागोवा घेता आला नाही. या प्रकरणी अनोळखी आरोपींविरुद्ध मारहाण व लूटपाट करण्याच्या आरोपान्वये भारतीय दंडसंहिता कलम 309 (6), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button