दिघी महल्लेच्या शिवारात जुगार अड्ड्यावर धाड
ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

-9 जुगारी अटकेत, 4.1 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 19 ऑगस्ट : चांदूर रेल्वे उपविभागातील मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या दिघी महल्ले गावाच्या शिवारात गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत हार-जीतचा जुगार खेळत असलेल्या नऊ जुगार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून रोकड, मोबाईल फोन, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 1 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय मारोतराव ठाकरे (30), गणेश विजयराव खंडारे (41), पंकज अरुण ठाकरे (29), कपिल सुभाष कोहले (23), अभिषेक मुरलीधर भबुतकर (35), जलील शहा दिलावर शहा (28), अताउल्ला खान रेहमत खान (31), युवराज रघुनाथ नेवारे (53) व हरीष दिनकर महल्ले (40) यांचा समावेश आहे. एलसीबीचे निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, एएसआय मंगेश लकडे, कर्मचारी सचिन मसांगे, दिनेश कनोजिया व संजय प्रदान हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना दिघी महल्ले गावाजवळील बबलू ढाकुलकर यांच्या शेतात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने धाड घालून जुगार अड्डा उध्वस्त केला.
या धाडीत जुगार्यांकडून 63 हजार 630 रुपये रोख, नऊ मोबाईल, तीन मोटारसायकली व जुगार साहित्य असा एकूण 4 लाख 1 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, सर्व आरोपींविरुद्ध मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




