नांदगावजवळ अवैध रेती वाहतूक पकडली

तीन डंपर जप्त, 25-30 ब्रास रेती हस्तगत

मोर्शी / 19 ऑगस्ट : परराज्यातून अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन करून तस्करी करणार्‍यांविरोधात मोर्शी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 ऑगस्ट रोजी नांदगावजवळ तीन डंपर पकडण्यात आले. या डंपरमधून 25 ते 30 ब्रास रेती जप्त करून पंधरा ते वीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
गौणखनिज तस्करीला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवार व तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकात तहसीलदार सागर ढवळे, नायब तहसीलदार चारुदत्त पाटील, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता. भरारी पथकाने सिनेस्टाईल थरारक पद्धतीने नंबर प्लेटवर ग्रीस लावून रेतीची वाहतूक करणार्‍या डंपरचा पाठलाग करून नांदगावजवळ अडवले. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48 (7) व (8) नुसार कारवाई करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे स्वतः रात्री बेरात्री रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत धडक मोहीम राबवत असल्यामुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, डंपरवर नंबर प्लेटला ग्रीस लावून अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने अशा वाहनांवर परिवहन विभागाने कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button