गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि लोकशाही उत्सवासाठी खाकी सज्ज

5 नामी गुंडांवर एमपीडीएची तयारी

-अवैध धंद्यांवर धडक कारवाई
-सोशल मिडियावर कडक नजर
अमरावती / 19 ऑगस्ट : शहरात आगामी आठवड्यापासून सुरू होणारा दहा दिवसीय गणेशोत्सव, त्यानंतरचा नवरात्री-दुर्गोत्सव आणि त्याचबरोबर होऊ घातलेले महापालिका निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर अमरावती पोलिस आयुक्तालयाने सज्जता दाखवली आहे. शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍यांना अजिबात सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिला.
बैठकीत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील कुख्यात गुंडांविरोधात तडीपाराची कारवाई तसेच 5 ते 6 जणांवर एमपीडीए लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळते. गुन्हेगारी कृत्यांसोबतच सोशल मीडियावर वादग्रस्त किंवा भडकाऊ मेसेज व व्हिडिओ टाकणार्‍यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. ‘रील गँग’वर धडक कारवाई करण्याचे आदेश सीपींनी दिले. चाकू-सुरे घेऊन व्हिडिओ बनवणार्‍यांवर कठोर पावले उचलली जाणार आहेत.
गणेशोत्सवापूर्वी पोलीसांनी अवैध धंद्यांवर छाप्यांची मालिका सुरू केली आहे. दारू, सट्टा, जुगार आदी अड्ड्यांवर एकामागून एक कारवाया करण्यात येत आहेत. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले की, शहराची शांतता भंग करणार्‍यांना कोणतीही दया दाखवू नका. जो कोणी गुंडा-एलिमेंट गुन्हेगारी किंवा अवैध धंद्यात सामील असेल, त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई होईल. गणेशोत्सव – दुर्गोत्सव – निवडणूक हे तिहेरी आव्हान असून, सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचा निर्धार पोलीस आयुक्तालयाने केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button