राहुल गांधींनी शपथपत्र द्यावे किंवा देशाची माफी मागावी
महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांवर आयोगाची कडक भूमिका

-ज्ञानेश कुमारांनी मतचोरीचा दावा फेटाळला
-म्हणाले, बनावट मतदारांचा आरोप हास्यास्पद
नवी दिल्ली/ 17 ऑगस्ट : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या मतचोरीच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी थेट मौन सोडले आहे. सात दिवसांच्या आत शपथपत्र दाखल करा, अन्यथा देशाची माफी मागा; याशिवाय तिसरा पर्याय नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी रविवारी दिला.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बनावट मतदार वाढवण्यात आल्याचा आरोप केला होता. 18 ते 21 वयोगटातील नवमतदारांच्या यादीत 70, 80, 89 वर्षांच्या व्यक्तींची नावे आढळली, तसेच अनेकांचा पत्ता ‘शून्य’ किंवा संशयास्पद नोंदवण्यात आला होता, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय, या बनावट मतदारांच्या जोरावर भाजपला विजय मिळाला, असेही ते म्हणाले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींचे नाव न घेता सर्व दावे फेटाळले. मतदान यादी आणि मतदान प्रक्रिया या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मतचोरीचा आरोप निराधार आहे. पीपीटी करून दाखले देऊन मतचोरीचे चित्र निर्माण करणे दिशाभूल करणारे आहे, असे ते म्हणाले. घर क्रमांक ‘शून्य’ असण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, देशातील अनेक कुटुंबांना अद्याप घर क्रमांक नाही. काहीजण रस्त्यावर, पूलाखाली किंवा झोपडपट्ट्यांत राहतात; त्यांनाही मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे अशा पत्त्यांना संशयास्पद म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या काळात एक कोटी नवमतदार वाढल्याचा राहुल गांधींचा आरोपही त्यांनी फेटाळला. जेव्हा वेळ होती तेव्हा हा मुद्दा का मांडला गेला नाही? निकाल लागल्यानंतरच अचानक आठवण का झाली? आतापर्यंत एकाही मतदाराचे नाव पुराव्यासह महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांना दिलेले नाही. निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी न्यायालयात याचिका दाखल झालेली नाही, असा सवालही त्यांनी काँग्रेसला केला.
शेवटच्या तासात मतदान वाढल्याच्या आरोपावर त्यांनी आकडेवारी सादर केली. दहा तास मतदान झाले असता सरासरी 10 टक्के मतांची टक्केवारी असते. मात्र शेवटच्या एका तासात सरासरीपेक्षा कमी मतदान झाले. त्यामुळे आरोपांना तथ्य नाही. सत्य सत्यच असते आणि सूर्य पूर्वेकडूनच उगवतो; कोणी कितीही वेळा खोटे बोलले तरी ते खरे ठरत नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील नवमतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजणार असून काँग्रेस-निवडणूक आयोगातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.




