अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई
3 डंपर जप्त, सहा आरोपींवर गुन्हे

-1 कोटी 46 लाखांचा मुद्देमाल ताब्यात
अमरावती / 17 ऑगस्ट : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत तीन डंपरमधून वाहतूक होणारी वाळू जप्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 46 लाख 67 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.
एमएच 27 डीटी 8683 या डंपरमध्ये 58,833 किलो वाळू (किंमत 88,200) आढळली. चालक शेख शहजाद शेख मोहम्मद (38, खामुंजा) याला अटक करण्यात आली असून मालक वैभव रामदास बिजवे (वलगाव) फरार आहे. एमएच 27 बीएक्स 7166 या डंपरमधून 58,470 किलो वाळू (किंमत 87,600) जप्त झाली. चालक शेख वकील शेख हबीब (38, सावंगी मगरामपूर) अटकेत आहे. मालक मुद्दसिर अहमद निसार अहमद मन्सूरी (छाया नगर) फरार आहे. एमएच 28 बीबी 6066 या डंपरमध्ये 61,109 किलो वाळू (किंमत 91,650) सापडली. चालक गजेंद्र धनाजी इवनाते (28, मोर्शी) अटकेत असून मालक अजय श्याम ढवळे (30, मंगलधाम कॉलनी) फरार आहे.
या कारवाईत एकूण तीन डंपर व त्यामधील वाळू असा मिळून 1 कोटी 46 लाख 67 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात सहा आरोपींविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात कलम 303(2), 221 भारतीय न्याय संहिता सह कलम 48(8)(2) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी अटकेत असलेल्या तिघांकडून पुढील चौकशी सुरू केली असून फरार मालकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.




