3 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा डाव फसला
शहरातील दोन धाडसी युवकांनी वाचविले

वरुड । 6 ऑगस्ट – शहरातील दोन धाडसी युवकांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर अहमदाबाद येथील 3 वर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करुन नेणार्या आरोपीला रंगेहाथ पकडुन रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच क्षेत्रातुन या दोन्ही धाडसी युवकांचे अभिनंदन केल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील विद्यार्थी परिषदेचे 10 युवक अभ्यास वर्गाकरीता नांदगाव खंडेश्वर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात ते सर्व युवक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान नांदगाव खंडेश्वर येथुन बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचुन प्रतिक्षा कक्षात बसुन होते. यावेळी त्यातील दैविक संजय खंडेलवाल आणी यज्ञेश प्रशांत यावलकर हे बडनेरा ते वरुड येण्याकरीता टिकीट काढण्याकरीता गेले असता अहमदाबाद येथील एक व्यक्ती त्यांचेकडे धावुन आला व ‘माझ्या 3 वर्षीय चिमुकल्या मुलीचे एक इसम अपहरण करुन नेत आहे, तिला वाचविण्यात माझी मदत करा, असे सांगितले’. याच दरम्यान दैविक खंडेलवाल व यज्ञेश यावलकर या दोन्ही धाडसी युवकांनी त्या अज्ञात अपहरणकर्त्याचा पाठलाग करीत त्याला पकडून त्याचेशी दोन हाथ करायला सुरुवात केली. यावेळी अपहरणकर्ता रेल्वे रुळावरुन पळुन जात असतांना त्याला पुन्हा पकडून त्याच्या तावडीतून चिमुकलीला सोडवुन पालकाच्या स्वाधीन करीत त्या अपहरणकर्त्यांला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी रेल्वे पोलिसांनी दोन्ही युवकांनी जागृत नागरीत होण्याचे कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तर मुलीच्या वडिलांनी सुद्धा आभार मानले. असे कौतुकास्पद कार्य करणार्या शहरातील दैविक खंडेलवाल आणी यज्ञेश यावलकर यांनी ऑरेंजसिटी शहराचे नाव लौकीक केल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातुन अभिनंदन केल्याजात आहे.




