नांदगाव पेठ परिसरातील घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

तलवारी, पिस्तुल, गुप्ती, फरशाचा समावेश

-आरोपीला अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी
अमरावती / 31 जुलै : शहरातील नांदगावपेठ परिसरात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून तब्बल 29 हजार 500 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. सदर शस्त्रसाठा एका गुप्त माहितीच्या आधारे मिळाला असून, या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही धडक कारवाई नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दिनांक 23 जुलै 2019 रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास नांदगावपेठ पोलिसांना आरोपी दीपेश दीपक काकडे (वय 45) याच्या पत्नीने माहिती दिली की, दीपेश याने आपल्या राहत्या घरी विनापरवाना तलवारी व बंदूक लपवून ठेवली आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत नांदगावपेठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी पंचासह आशिष नगर, वडेकर ले-आऊट, नक्षत्र अपार्टमेंट मागे दत्तवाडी येथील दीपेश काकडे यांच्या राहत्या घरी छापा टाकला. झडतीदरम्यान पोलिसांनी आढळले की, घरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची शस्त्रे विनापरवाना साठवून ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पाच लोखंडी तलवारी, एक पिस्तुल, दोन चायनीज बनावटीची शस्त्रे, एक गुप्ती, एक कोयता, एक कुकरी, दोन फरशा यांचा समावेश आहे. एकूण जप्त शस्त्रसाठ्याची किंमत अंदाजे 29,500 इतकी आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर शस्त्रसाठा दीपेश काकडे यांचा मुलगा प्रेम दीपेश काकडे (वय 27) याचाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने कबुली दिली की, सदर शस्त्रसाठा त्यानेच आपल्या घरात लपवून ठेवला होता. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. प्रेम काकडे याला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. पुढील तपासात पिस्तुलातील राऊंड्स व त्याचा वापर यासंदर्भात आरोपीकडे महत्त्वाची माहिती असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले.
ही संपूर्ण कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, नांदगावपेठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, पोलीस हवालदार राजाभाऊ राऊत, शिपाई राजे खान, अमित ढोले, सय्यद राजा, संजय निहारे, शितल चक्रनारायण, वैभव तिखिले, निलेश सवईकर यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button